औरंगाबाद : व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून दोन धर्मामध्ये जातीय तणाव निर्माण होईल, अशा अशयाची पोस्ट प्रसारीत केल्या प्रकरणी सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवनारायण मोतिलाल तोतला(50) या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्स अॅपद्वारे दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट प्रसारित केल्याचे पोलिसांना अढळून आल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गु.र.नं. 117/2020, कलम 215 अ, भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन शिवनारायण तोतला यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, परिमंडल एकचे उपायुक्त निकेश खाटमोडे, स.पो.आ. ( शहर) हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाथरकर यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस.आर. पाटे अधिक तपास करीत आहेत. औरंगाबाद शहर पोलिसांकडून अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. नागरिकांनी आपल्याकडून धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसारीत होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.